| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम असून, वारंवार निवेदने देऊनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने अखेर बार्डी गावातील महिला ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली. नळपाणी योजनेचे पाणी गावात तीन ते चार दिवसांतून एकदा आणि तेही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक घरांना पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
बार्डी गावातील नळपाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. ग्रामस्थांना पाण्याची अडचण होत असल्याबद्दल 26 डिसेंबर 2025 आणि 18 मार्च 2026 रोजी कर्जत पंचायत समितीकडे लेखी निवेदन देऊन नळपाणी योजनेचे कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यात बार्डी गावात ग्रामपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा हा अतिशय अनियमित असून, 3 ते 4 दिवसातून एकदा पाणी येते. तसेच येणारे पाणी हे अतिशय कमी दाबाने येत असून, कित्येक घरांना तर पाणी मिळत देखील नाही, याबाबत आम्ही आपणास पत्र दिले होते. ग्रामपंचायत मार्फत या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तात्पुरते आश्वासन देऊन वेळ ढकलण्यात येते, परंतु कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे भेट देऊन लेखी निवेदन देखील दिले आहे, तरी देखील आमच्या गावातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
शासनाकडून आणि जिल्हा परिषदकडून नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी कोणतेही सहकार्य पाणी पुरवठा विभाग करीत नाही. त्यामुळे कर्जत पंचायत समितीमध्ये मोर्चादरम्यान संबंधित अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने महिलांनी तब्बल अडीच तास ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. अखेर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्या मध्यस्थीने पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कर्जत पंचायत समितीकडून कार्यवाही झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असे इशारा महिला वर्गाने दिला आहे. या महिलांचे मोर्चात गावातील माजी सदस्या माजी उप सरपंच आणि महिलांचा सहभाग होता.






