| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा येथील एनआयएसएम-सेबी रस्त्यावर रात्री आठनंतर काही तरुणांकडून भररस्त्यावर मद्यप्राशन केले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मार्गावर रात्रीच्या वेळी काही जण मद्यप्राशन करून रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी सायंकाळनंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विभागीय अध्यक्ष हरेश उतेकर यांनी पोलिसांकडे या प्रकाराची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
मोहोपाडा-एनआयएसएम-सेबी रस्त्यावर सायंकाळी सातनंतर नियमित पोलीस गस्त वाढवावी, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उतेकर यांनी केली आहे. सायंकाळनंतर या मार्गावरून मोठ्या संख्येने महिला व नागरिक ये-जा करतात. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांमुळे महिलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रसायनी पोलिसांनी या भागात नियमित गस्त घालून परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत नागरिकांकडून व्हिडिओच्या माध्यमातूनही तक्रारी करण्यात येत असून, पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






