। अलिबाग । विशेष प्रतिनीधी ।
जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील जनतेचा आरोग्याच्या आधारस्तंभ मानला जातो; मात्र हा आधार रिक्त पदांनी सध्या बेजार बनला आहे.
जिल्हा रुग्णालयातील नियमित कामकाजासाठी एकूण 446 पदे मंजूर आहेत. यातील 299 पदे भरली असून तब्बल 147 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये वर्ग 1 मधील मंजूर 19 पैकी केवळ 3 पदे भरलेली आहेत. यात निवासी वैद्यकीय अधिकारी, भुलरोग तज्ज्ञ, मनोरोग तज्ज्ञ अशा महत्वाच्या पदांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता शासकीय आरोग्य सुविधेवरच अवलंबून असते. मात्र या आरोग्य सुविधेत मोठया प्रमाणावर उणीवाच असल्याने जनता त्रस्त झाली आहे. कोरोना काळात अपुर्या सुविधेमुळे जनतेचे होणारे नुकसान अधिक गडद बनले आहे. यावेळी शासकीय आरोग्य सुविधेची गरज का असते, हे जास्त स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या वर्ष दोन वर्षात रिक्त पदे व अपुरी सामग्री याची जोरदार चर्चा झाली. रायगड जिल्ह्यात मात्र अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ही चर्चा जास्तच झाली. कारण येथील रिक्त पदे व अपुरे साहित्य याची टक्केवारी जास्त आहे.
जिल्हा रूग्णालय वर्ग 1 मध्ये एकूण 19 पदे मंजूर आहेत. यातील अवघे तीनच पदे भरलेली असून तब्बल 16 पदे रिक्त आहेत. जे भरलेली पदे आहेत त्यात स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे दोन तर तीसर्या पदावरील डॉक्टर तर गायबच आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. मोठया प्रमाणावर वर्ग 1 मध्ये रिक्त पदे असल्याने महत्वपूर्ण असलेल्या निवासी वैद्यकिय अधिकारी या पदाचा भार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोपविण्यात आला आहे. आरोग्य सुविधा सुधारुन ताण कमी करण्यासाठी उर्वरित पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे.
वर्ग 2 मध्ये एकूण 31 पदे मंजूर आहेत. यातील 28 पदे भरलेली असून केवळ 3 पदे रिक्त आहेत. सारासे गट ब मधील मंजूर 2 पैकी 2 पदे भरली आहेत. वर्ग 3 मध्ये मंजूर 240 पैकी 187 पदे भरली असून 53 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये अधिसेविका एक, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, बालरोग परिसेविका, मनोविकृती परिसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भौतिकोपचार तंज्ज्ञ, दंत आरोग्यक, दंत यांत्रिकी, भांडारपाल तथा वस्त्रपाल, स्वच्छता निरीक्षक, दूरध्वनी चालक, शिंपी, नळ कारागिर, सुतार, लघु टंकलेखक (मराठी), वरिष्ठ लिपिक, टंकलेखक लिपिक अशाप्रकारे एकूण 75 पदे रिक्त आहेत. वर्ग 4 मध्ये 154 पदे मंजूर आहेत. यातील 79 पदे भरली आहेत. 75 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये मुकादम, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, शस्त्रक्रियागृह परिचर, सफाईगार, धोबी, न्हावी, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, माळी अशी पदे रिक्त आहेत.
जिल्हा रुग्णालयात रिक्त असलेल्या पदांची माहिती प्रत्येक महिन्यात शासनाला कळविली जाते. रिक्त पदांबाबत नेहमी शासनाला पत्रव्यवहार प्रशासकीय पातळीवर सुरू असतो. मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या डॉक्टर भरतीसाठी सुद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया राबविली जाते; परंतु प्रतिसाद मिळत नाही. तरीही रिक्त पदे आहेत म्हणून सेवा देण्यास कमी पडू नये, याची काळजी घेत असतो.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक






