एसटीच्या मार्गावर 15 हजार खासगी वाहने

। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटीच्या मार्गावर खासगी बस, शालेय बस तसेच अन्य खासगी वाहने चालवण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली. सुरुवातीला कमी प्रमाणात धावत असलेल्या या खासगी सेवांमध्ये वाढ होऊ लागली असून राज्यात 15 हजार 462 खासगी वाहने एसटीच्या मार्गावर धावत असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
एसटीच्या कर्मचार्‍यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी 29 ऑक्टोबरपासून राज्यातील काही आगारांमध्ये संप सुरू केला. 250 आगारांपैकी फक्त राज्यातील 25 ते 30 आगारांमध्येच संप सुरू होता. त्यामुळे 70 ते 80 टक्के एसटी सेवा सुरूच होती, परंतु हा संप अधिक तीव्र झाला आणि एसटी सेवा ठप्पच झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप मिटेपर्यंत खासगी प्रवासी बस, शालेय बस, कंपनीच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहने चालवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली.मुंबईत एसटीचे तीनही आगार सध्या बंदच ठेवले आहेत. त्यामुळे आगारातून किंवा त्याच्या बाहेरून एसटी सुटत नाहीत, परंतु अन्य ठिकाणाहून एसटीच्या मार्गावर खासगी वाहनांना एसटीचे प्रवासी घेऊन जाण्याची मुभा असल्याने मुंबईतून 4 हजार 114 वाहने धावत आहेत.

Exit mobile version