। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणार्या रुग्णांचा आकडा कमी असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी नव्याने 152 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 148 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 47, पनवेल ग्रामीण 16, उरण 2, खालापूर 9, कर्जत 3, पेण 11, अलिबाग 45, माणगाव 2, रोहा 3, सुधागड 2, श्रीवर्धन 1, म्हसळा 2, महाड 9 असे एकूण 152 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड तळा आणि पोलादपूर तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे तर पनवेल ग्रामीणमध्ये 4, उरण आणि खालापूर या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 388 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 735 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 160 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 493 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.