मुक्त पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन
| कोर्लई | प्रतिनिधी |
साळाव-मुरुड रस्त्यावरील सुरू असलेल्या कामांमधील घिसाडघाई तसेच परेशनाका ते एकदरा ब्रीज या मार्गाची अत्यंत खराब अवस्था याबाबत मुरुड तालुका मुक्त पत्रकार संघातर्फे तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी यांनी हे निवेदन स्वीकारले.
पावसाळ्यानंतर रस्ते विकास महामंडळाकडून साळाव-मुरुड मार्गावर रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी काम समाधानकारक पद्धतीने सुरू असले तरी कोर्लई, भोईघर फाटा, ताराबंदर, बाराशिव, काशिद, सर्वे, दोडा, नांदगाव, मजगाव, विहूर या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजू उखडलेल्या आहेत. तसेच मोरी बांधकामासाठी खड्डे खणण्यात घिसाडघाई होत असून ते बुजवण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अलिबागमुरुड मार्गावरून दररोज प्रवास करणारे वाहनचालक, कर्मचारी आणि प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नुकत्याच सर्वे येथे मोरीसाठी खणलेल्या खड्ड्यात मोटारसायकल घसरून वनरक्षक सूरज सारंगे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच मुरुडमधील परेशनाका ते एकदरा ब्रीज मार्गावर अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य असून, या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करणे अत्यावश्यक झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी बांधकाम विभागाला वारंवार निवेदने दिली असली, तरी अद्याप परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर साळाव-मुरुड रस्त्यावरील कामे दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत तसेच परेशनाकाएकदरा ब्रीज मार्गावरील खड्डे बुजवून पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी मुक्त पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष राजीव नेवासेकर, उपाध्यक्ष अजित कासार, प्रदीप बागडे, सचिव नरेश वारगे, सहसचिव नैनिता कर्णिक, खजिनदार पांडुरंग आरेकर, पत्रकार जाहिद फकजी आणि जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर फलेभाई उपस्थित होते.







