1567 पूर आणि दरडग्रस्त कुटुंबांना प्रतीक्षा पुनर्वसनाची

| सुयोग आंग्रे | रायगड |

नैसर्गिक आपत्ती आणि रायगड जिल्हा असे समीकरण 2005 पासून सुरु झाले आहे. सरासरी पेक्षा अधिक पडणार्‍या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांना येणारे महापूर आणि दरडींचे भूस्खलन याची भीती नागरिकांसह प्रशासनाला देखील असते. गेल्या 19 वर्षात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 2305 हजार कुटुंबे बाधित झाल्याचे सरकार दरबारी नोंद आहे. यापैकी तब्बल 1567 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत, त्रुटींमुळे प्रस्ताव प्रलंबित आहे, निधी प्राप्त झालेला नाही, भूखंड आणि निधी मिळाला आहे पण बांधकाम करण्यात आलेले नाही अशी बहुतांशी कारणे पुनर्वसन रखडण्यामागे असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. आतापर्यंत केवळ 449 कुटुंबाना घरे मिळाली असल्याचे विदारक चित्र रायगड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

पूर आणि दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रडारवर आला. रायगडातील वाढणारे काँक्रिटचे जंगल, वाढणारे भराव आणि अनधिकृत उत्खनन यामुळे जिल्ह्याला पुराचा आणि दरडी कोसळण्याचा धोका अधिक वाढला. गेले 19 वर्षात पूर आणि दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे सुमारे 40 गावांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यातील 23 गावे , पोलादपूर तालुक्यातील सात गावे, माणगाव तालुक्यातील चार गावे , रोहा तालुक्यातील तीन गावे, पनवेल तालुक्यातील दोन गावे, कर्जत आणि खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. आपत्तीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांपैकी 449 कुटुंबांचे पुनर्वसन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामध्ये महाड तालुक्यातील जुई बुद्रुक येथील 66, रोहण 12, दासगाव 57, तळिये 92,कोंडिवते 66,कुरळे दंडवाडी 17 दासगाव आदिवासीवाडी 41, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी 15, कोतवाल खुर्द 15, महाळुंगे 4, बोरावले 8, तुटवली 5, माणगाव तालुक्यातील न्हावे 8, भांदरे 4, रोहा तालुक्यातील वाळंजवाडी 8, महादेव वाडी 31 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि पुनर्वसनास पात्र ठरलेल्या तब्बल 2078 कुटुंबांचे पुनर्वसन करणायची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची होती. परंतु गेल्या 19 वर्षात दासगाव आणि रोहण येथील 62 कुटुंबांनी नाकारलेल्या पुनर्वसनाव्यतिरिक्त तब्बल 1567 कुटुंब आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये महाड तालुक्यातील दासगाव येथील 45 , तळिये 79, परमाची 128, कोंडिवते 38, सव 83, कोथेरी 15, शिंगरकोंड मोरेवाडी 42, तुडील 62, मुठवली 65, मोहत सुतारवाडी 67, सोनघर 102, आंबिवली बुद्रुक पातेरेवाडी 24, चांढवे खुर्द 153, आंबेशिवथर सह्याद्रीवाडी 22, रुपवली बौद्धवाडी 8, खैरे तर्फे तुडील 27, चोचिंदे 40, दाभोळ मोहल्ला , बौद्धवाडी 20 चोचिंदे कोंड 48, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी 14, कोतवाल खुर्द 11, केवनाळे 128, तुटवली 5, साखर सुतारवाडी 44, माणगाव तालुक्यातील टोळ खुर्द 11, बापदेव पट्टी 8, पनवेल तालुक्यातील धोधाणी 67, हरिग्राम 37 कर्जत तालुक्यातील 69 आणि खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी 47 या गावांचे पुनर्वसन रखडले आहे.

Exit mobile version