पालिका हद्दीतील 167 झाडांची होणार कत्तल

विमानतळ, रेल्वे प्रकल्पासाठी पालिका हद्दीतील झाडांचा जाणार बळी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पालिका हद्दीतील 167 वृक्षांचा बळी जाणार आहे. पालिकेने तशा स्वरूपाची नोटीस संबंधित वृक्षावर चिकटवली असून, यासंदर्भात नागरिकांना काही हरकत अथवा सूचना करायची असल्यास योग्य कागदपत्रांसहित सात दिवसांच्या आत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभाग आणि उद्यान विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विकास काम करताना मोठ्या प्रमाणात केल्या जात असलेल्या वृक्षतोडीमुळे नागरिकांना सध्या ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी याकरिता प्रशासन आणि काही वृक्षप्रेमी संस्था तसेच नागरिक झटत आहेत. अशा वेळी पनवेल पालिका हद्दीतील 167 वृक्षांचा मात्र विकासकामासाठी बळी जाणार असल्याने निसर्गप्रेमी नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. पनवेल पालिका हद्दीलगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु आहे. विमानतळाच्या या कामादरम्यान कर्नाळा स्पोर्ट्स या ठिकाणी इंटरचेंज काम सुरु असून, येथे असलेले 142 वृक्ष कामात अडथळा ठरत असल्याने हे वृक्ष तोडण्याची परवानगी संबंधित विभागाकडून पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभाग आणि उद्यान विभागाकडे केली होती तसेच पालिका हद्दीतील पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामात अडथळा ठरणारे 25 वृक्ष तोडण्याची परवानगी रेल्वे विभागाकडून पालिकेकडे करण्यात आली होती. पालिकेकडून ही परवानगी देण्यात आली असून, तशा स्वरूपाची नोटीस वृक्षांवर लावण्यात आली आहे.

वृक्षतोड करण्याऐवजी या वृक्षांचे पुनर्रोपण करता येईल का यासाठी प्रयत्न करण्यात आले पाहिजे. आणि ते शक्य नसल्यास तोडलेल्या वृक्षाच्या संख्येइतक्या नव्या रोपांची लागवड करण्यात आली पाहिजे.

– अजित अडसूळे, सामाजिक कार्यकर्ते


संबंधित विभागाकडून वृक्ष तोडावे लागणार असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. शासनाचे काम असल्याने तशी परवानगी देण्यात आली आहे.

– संदीप पवार, अधिकारी, वृक्ष प्राधिकरण विभाग

Exit mobile version