। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला आहे. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्व मजूर असून बसच्या समोर झोपले होते. अयोध्या-लखनऊ महामार्गावर बाराबंकी येथे हा अपघात झाला आहे. काही मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हे सर्व मजूर बिहारचे आहे. हे मजूर हरियाणामधून परतत असताना त्यांची बस मंगळवारी रात्री हायवेवर बंद पडली. यामुळे ते हायवेवरच बससमोर झोपले होते. ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने बस या मजुरांच्या अंगावर गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस बंद पडल्यानंतर चालकाने प्रवाशांना रिपेअरिंगचं काम होईपर्यंत आराम करण्यास सांगितलं होतं. यानंतर काही वेळात ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत.