19 वर्ल्ड कप स्पर्धा -भारताची क्वार्टर फायनलमध्ये धडक

दुबळ्या युगांडावर 326 धावांनी मात
29 जानेवारीला बांगलादेशशी भिडणार
गयाना | वृत्तसंस्था |
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने दुबळ्या युगांडावर 326 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. ग्रुप बीमध्ये भारताने आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारत गटात टॉपवर आहे. आधी दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी, त्यानंतर आयर्लंडवर 174 धावांनी विजय मिळवला होता.
अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. भारताने निर्धारीत 50 षटकात पाच बाद 405 धावांचा डोंगर रचला. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी भारताने 2004 च्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 425 धावांचा डोंगर उभारला होता.
भारताने दिलेल्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा डाव अवघ्या 79 धावात आटोपला. त्यांचे पाच फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. दोघांनीच फक्त दोन आकडी धावा केल्या. यात कॅप्टन पास्कलने सर्वाधिक (34) धावा केल्या. फलंदाजीत विशेष चमक न दाखवू शकलेल्या कॅप्टन निशांत सिंधूने गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. अन्य गोलंजदाजांनी त्याला चांगली साथ दिली. अवघ्या 20 षटकात युगांडाचा डाव आटोपला. भारताचा बांगलादेशविरुद्धचा क्वार्टरफायनलचा सामना 29 जानेवारीला होणार आहे.

Exit mobile version