। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आरतीने 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले आहे. यंदाच्या जागतिक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले आहे. या स्पर्धेत आरतीने 44 मिनिट 39.39 सेकंदाची नोंद करताना नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. आरतीने तिच्या आधीच्या 47:21.04 सेकंदाच्या वेळेत 3 मिनिटांची सुधारित वेळ नोंदवली आहे. ही कामगिरी तिने मार्च महिन्यात झालेल्या नॅशनल फेडरेशन चषक स्पर्धेत केली होती. तेव्हा तिने सुवर्णपदक जिंकले होते.
तसेच, पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. रिहान चौधरी, अंकुल, अबिराम प्रमोद आणि जय कुमार यांनी 3 मिनेट 8.10 सेकंदाच्या वेळेसह 20 वर्षांखालील स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रम नावावर केला आहे. या कामगिरीसह त्यांनी हिटमध्ये दुसरे स्थान पटकावून अंतिम फेरीत स्थान जिंकले आहे. दरम्यान, महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिले हिटमध्ये रुजूला अमोल भोसले. नोओले कोर्नेलिओ, अबिनया राजराजन आमि सुदीक्षा वद्लूरी यांनी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. त्यांनी 45.31 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. मात्र, थोडक्यासाठी त्यांना अंतिम सामन्याला मुकावे लागले आहे.
स्पर्धेतील भारताची एकूण कामगिरी संमिश्र असली तरी, या काही अलीकडच्या यशामुळे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 17 वर्षीय पूजाचा महिलांच्या उंच उडीमध्ये 20 राष्ट्रीय विक्रम आणि शारुक खानचा 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये विक्रम, यामुळे भारतीय संघ मागील आवृत्तीत जिंकलेल्या तीन पदकांशी बरोबरी किंवा तो विक्रम मोडू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.