| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने कुमार-कुमारी मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुंबईतील माटुंगा येथील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवनेरी सेवा मंडळ आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांनी आपला दबदबा सिद्ध करत अजिंक्यपदावर नाव कोरले.
या खो-खो स्पर्धेच्या अंतिम दिवशी रंगलेल्या सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले होते. कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिरचा 4-3 असा धुव्वा उडवत अजिंक्यपद मिळवले. शिवनेरीने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत श्री समर्थला पुनरागमनाची संधीच दिली नाही. शिवनेरीच्या आरुषी गुप्ता, मुस्कान शेख, सिद्धी शिंदे, त्रिशा गुप्ता, गार्गी काडगे यांनी संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. तर, पराभूत श्री समर्थच्या खुशी यादव, सोनम शेलार, आस्था महाडिक, ग्रंथा वारघडे यांनी दमदार कामगिरी केली. मात्र, त्या संघाला विजयाचा मुकुट प्रदान करू शकल्या नाहीत.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा 10-9 असा 1पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले. ओम साईश्वर सेवा मंडळाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आम्हीच बॉस असल्याचे दाखवून देत सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपदाला गवसणी घातली. ओम साईश्वरच्या प्रशिक मोरे, निषाद ताम्हणकर, सार्थक माडीये, अधिराज गुरव, आयुष जाधव व आदित्य राणे यांनी संघाला अजिंक्यपद मिळवून देताना दमदार कामगिरी केली. तर पराभूत सरस्वतीच्या वरुण गुप्ता, ओम ननावरे, समर्थ उपशेटे , ओमकार खरंगटे व साई तुळसणकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र, संघाला विजय मिळवून देता आला नाही.
दरम्यान, कुमारी गटातील तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचा 5-3 असा पराभव केला. तर, कुमार गटातील तृतीय क्रमांकाच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने विद्यार्थी क्रीडा केंद्रचा 4-3 असा पराभव करत तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव महाराष्ट्र क्रीडा विकास फाऊंडेशनतर्फे करण्यात आला. कै. वि. वि. करमकर यांच्या स्मरणार्थ प्रशिक्षक राकेश कदम (शिवनेरी मुली गट) आणि भूपेश गायकवाड (ओम साईश्वर कुमार गट) यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरतर्फे प्रथम चार संघांना रोख पारितोषिके आणि चषक प्रदान करण्यात आले. अध्यक्ष उन्मेश नरवणे यांनी काही उभरत्या खेळाडूंनाही विशेष रोख पारितोषिके देऊन प्रोत्साहन दिले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार महेश सावंत, महाराष्ट्र क्रीडा विकास फाऊंडेशनचे रवी मांद्रेकर, बाळ वाडवलीकर, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचे अध्यक्ष उन्मेश नरवणे, प्रकाश नकाशे, ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब तोरसकर, सुधाकर राऊळ, सुरेंद्र विश्वकर्मा, नितीन पाष्टे आणि विकास पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.






