वरसोली, मुरुड किनारी पहिला एरोस्पोर्ट्स फेस्टिवल

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

कोकणातील पहिला एरोस्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे. ज्याकरता पर्यटक युरोपमध्ये किंवा इंडोनेशियामध्ये जातात अशा स्वरूपाचे साहसी खेळ कोकणातल्या समुद्रकिनार्‍यावर अनुभवता येतील अशी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. यात पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र मेरीटाईमबोर्डाचे विशेष सहकार्य मिळत आहे. गुजरातच्या रण फेस्टिवलमध्ये आकाशातून रण महोत्सव दाखवण्याची व्यवस्था करणारा महाराष्ट्रातील तरुण गोविंद येवले हा या उपक्रमाचे नियोजन करत आहे. दुबईमध्ये अशा स्वरूपाचा उपक्रम चालवणारा गोविंद आता कोकणात एरोस्पोर्ट्स उपक्रम राबवणार आहे.


अलिबाग तालुक्यात वरसोलीच्या समुद्रकिनार्‍यावर हा अनुभव आता पर्यटकांना घेता येईल. अशीच सुविधा मुरुड जंजिर्‍याच्या समुद्रकिनार्‍यावरती उभारली जाणार आहे. साहसी पर्यटनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून हवेतून पर्यटकांना कोकणच्या समुद्रकिनार्‍याचे आणि मुरुड जंजिराचे सुद्धा दर्शन घेता येणार आहे. येथील स्थानिक गावकरी, ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणचे प्रमुख नागरिक मिलिंद कवळे आणि प्रकाश सर पाटील सर्वजण अतिशय उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत आहेत. आणि स्थानिक रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आणि पर्यटन उद्योग वाढीच्या दृष्टीने गावकर्‍यांचा याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. साहसी पर्यटनामध्ये प्रचंड मोठे काम उभारणारे कोकणातील उद्योजक महेश सानप, मंगेश कोयंडे, प्रसाद चौलकर हे या उपक्रमात सहभागी होत आहेत.

वरसोली बीच फेस्टिवल, आणि मुरुड बीच फेस्टिवल हे दोन उपक्रम या मे महिन्यामध्ये  आयोजित केले जाणार आहेत. एक अतिशय समृद्ध आणि अविस्मरणीय अनुभव कोकणच्या किनार्‍यावर या छोट्या छोट्या विमानातून अनुभवता येईल. अशी माहिती कोकण बिझनेस फोरम कोकण पर्यटन उद्योग संघाच्या संजय यादवराव यांनी दिली आहे.

Exit mobile version