पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल
| महाड | प्रतिनिधी |
देशामध्ये व राज्यामध्ये अनेक प्रकारच्या बोगस कंपन्या स्थापन करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसाच काहीसा प्रकार महाड शहरामध्ये घडला आहे. महाड शहरामध्ये शिवाजी चौक, अंबिका कॉम्प्लेक्स येथे कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीची शाखा चालू करण्यात आली होती. एजंट व ग्राहकांना आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून नफा कसा मिळतो याचे आमिष दाखवून सुमारे दोन कोटी 97 लाख दहा हजार पाचशे पंधरा रुपयांचा ग्राहकाला गंडा घातला आहे. त्यापैकी गुंतवणुकीतील 41 लाख 66 हजार 930 रुपये ग्राहकाला परत करून सुमारे दोन कोटी 55 लाख 43 हजार 585 रुपये ग्राहकाची फसवणूक केली आहे.
संजय गणपत वांद्रे, रा. पायरीकोंड, पोस्ट खर्डी, ता. महाड यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपी विष्णू पांडुरंग दळवी, रा. डोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, विजय चंद्रकांत सुपेकर, सध्या रा. वसई, मूळ राहणार पायरीकोंड खर्डी, ता. महाड व सुनील रघुनाथ वार्दे, रा. नालासोपारा, मूळ रा. पायरीकोंड खर्डी, ता. महाड अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर हे करीत आहेत.