। छ. संभाजीनगर । प्रतिनिधी ।
शेतात मशागत करत असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून २ शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी चिखलठाणा परिसरात हे दोघे खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामासाठी गेले होते तेव्हा ही दुर्घटना घडली. काम करत असताना तुटलेल्या विजेचा वहिनीला स्पर्श झाला आणि दोघांचा मृत्यू झाला. कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५४) व बाळू जगन्नाथ दहीहंडे (वय २८) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.वादळी वाऱ्यामुळे शेतातून जाणारी उच्चदाबाच्या वीज तारेल तुटून १५ दिवस झाले होते व याबाबत नागरिकांनी सूचना करुनही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळेत दुरुस्ती केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी जालना रोडवर दोन तास ‘रास्ता रोको’ केले. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करीत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.






