बिबट्याची सर्व १८ नखे जप्त करण्यात वनविभागाला यश
| माणगांव | प्रतिनिधी ।
माणगाव पोलिसांनी बिबट्याची नखे विकणारी टोळी ४ दिवसांपुर्वी अटक केली होती. त्यांच्या कडून १० बिबट्याची नखे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणात सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना दि.२३ सप्टेंबर रोजी माणगाव येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर केल्यावर त्यांच्या जबानीच्या आधारे आणखी दोन आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्या कडून बिबट्याची ८ नखे जप्त करण्यात येऊन असे एकुण १८ नखे जप्त करण्यात वनविभागाला यश आले आहे.
वर्ग वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या अवयवांना बाजारपेठेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक टोळ्या वन्यजीवांची हत्या करून तस्करी करीत आहेत. अशीच बिबट्याच्या नख्यांची विक्री करीत असताना टोळीतील ४ आरोपी व १० बिबट्याची नखे वनविभाग माणगांव व माणगांव पोलिसांनी गजाआड केले होते.
याप्रकरणाचा अधिक तपास माणगाव वनविभाग खाते करीत होते. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींकडुन माहिती मिळाल्यावर आरोपी क्र.५ रमेश विष्णू जाधव रा.खरबाची वाडी ता.रोहा यांच्याकडून ५ बिबट्याची नखे तसेच आरोपी क्र.६ मारुती भिकाजी चव्हाण रा.रेवेची वाडी ता.रोहा यांच्याकडून ३ बिबट्याची नखे वनविभागाकडून जप्त करण्यात आली आहे. दि.२६ सप्टेंबर रोजी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींना माणगाव न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी क्र.४ मंगेश पवार रा.गारमर वाडी ता.रोहा याला वाढीव १ दिवसाची वन कोठडी तर उर्वरित ३ आरोपी मंगेश कुर्मे, नइम शेख, दत्ताराम पवार यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
पुढील तपास उपवन संरक्षक आप्पासाहेब निकत व सहाय्यक वन संरक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल माणगाव अनिरुद्ध ढगे व निजामपूर वनपाल संजय चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.







