| महाड | प्रतिनिधी |
माजी आमदार शांतारामभाऊ फिलसे आणि माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी महाड – पोलादपूर तालुक्यांच्या जडणघडणीसाठी केलेली कामे आजही कायम विकासकामांची साक्ष देत आहेत. परंतु विद्यमान आमदार पूर्णतः व्हीजनलेस असल्याची टीका महाड विधानसभा संपर्कप्रमुख अमित मोरे यांनी वहूर जिल्हा परिषद मतदारसंघातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, विरारवासीय निष्ठावंत शिवसैनिकांच्या जाहीर मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली.
शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथील पर्ल सेंटर हाऊसमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. यावेळी अमित मोरे म्हणाले की, ज्यांच्याकडे नाही अशा व्हीजनलेस आमदारांकडून यापुढे चांगल्या कामांची अपेक्षा करणे हाच जनतेचा अपेक्षाभंग असेल. गद्दार कितीही झाले तरी शिवसेना संपणार नाही. सर्व शिवसैनिक जागेवरच आहेत. कोण कुठेच गेलेला नाही. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. हेच मावळे आगामी काळात गद्दारांचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक खंबीर आहोत,असेही ते म्ङणाले.
यावेळी महाड विधानसभा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत धोंडगे , तालुका संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनीही गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी आम्ही सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याच पाठीशी ठामपणे आहोत, असा निर्धार केला. यावेळी महाड तालुका मुंबई सहसंपर्कप्रमुख दिलीप अंबावले, अॅड. मंगेश हुमणे, विन्हेरे विभाग संपर्कप्रमुख अनंत महाडकर, सुदाम वाडकर, विन्हरे विभाग संघटक अनंत गवळकर, ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता देवळे, युवा नेते जमीर देशमुख, ज्ञानदेव निंबरे, दिलीप देवळे, विष्णू गोठल, संतोष पेंढारी, गणपत वाघे, समीर रेवाळे आदी शिवसैनिकांनी मनोगते व्यक्त केली. वहूर विभाग संपर्क प्रमुख अमोल पवळेकर यांनी प्रास्ताविक केले. रुपेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर मिलिंद चिबडे यांनी आभार मानले.
पदाधिकार्यांच्या निवडी
शिवसेना महाड विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी चंद्रकांत धोंडगे तर महाड तालुका मुंबई सहसंपर्क प्रमुखपदी दिलीप अंबावले आणि अॅड. मंगेश हुमणे, विन्हेरे विभाग मुंबई संघटकपदी अनंत गवळकर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.