मुरुड समुद्रकिनार्‍यावर ऑलिव्ह रिडले कासवाची 2 घरटी

तब्बल 237 अंडी घरट्यात सुरक्षित

। हर्णै । वृत्तसंस्था ।

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्‍यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची दोन घरटी आढळून आली आहेत. एकात 116 तर दुसर्‍यात 121 अंडी आहेत. दापोली तालुक्यात या हंगामात पहिल्यांदाच मुरुड समुद्रकिनार्‍यावर एकाच महिन्यात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या अंड्यांची दोन घरटी तयार झाली आहेत.

या घरट्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच कासवाची पिल्ले समुद्राकडे झेप घेतील, अशी माहिती येथील जीवरक्षक राजेश शिगवण यांनी दिली. दापोली तालुक्यातील मुरुड गावचा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून जगाच्या नकाशावर याची नोंद आहे. मुरुड गाव पर्यटनाप्रमाणे आता कासवांचे गाव म्हणून देखील हळूहळू प्रसिद्ध होत आहे.

गेल्या वर्षी 7 जानेवारी 2023 रोजी पहिलं घरटं आढळून आले होते, तर एप्रिल 2023 मध्ये शेवटचं घरट सुरक्षित केल होतं. गेल्यावर्षी अंदाजे 2980 अंडी सुरक्षित केली होती आणि त्यातून अंदाजे 1555 पिल्ले सोडली होती, अशी माहिती शिगवण यांनी दिली.

पर्यावरणपूरक उपक्रम
गेली सुमारे 15 वर्षे या किनार्‍यावरून हजारो कासवांची अंडी संरक्षित करून 54 दिवसांच्या कालावधीनंतर अंड्यांमधून बाहेर येणार्‍या पिल्लांना समुद्रात सोडले जाते. नुकतेच मुरुडच्या समुद्र किनार्‍यावर 9 डिसेंबर 2023 या दिवशी एक मादी कासव अंडी घालून गेल्याचे दिसून आले. 116 कासवांची अंडी दिसून आली. त्यानंतर 27 डिसेंबर 2023 यादिवशी दुसरे 121 अंड्यांचे घरटे आढळून आले दोन्हीही घरटी जीवरक्षक राजेश शिगवण व त्यांच्या सहकार्‍यांनी संरक्षित केली आहेत.


Exit mobile version