| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील वीर गावाच्या परिसरात राहात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर विक्रम रिक्षेतून प्रवास करताना तिच्यावर अत्याचार करणार्या नराधमाला माणगाव सत्र 20 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख 55 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला असून या निकालाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
1 मार्च 2020 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला विक्रम रिक्षाने महाड वरून वीर गावाकडे ही मुलगी आपल्या आई वडिलां बरोबर प्रवास करीत होती. त्याचवेळी रिक्षेतून प्रवास करणारा पुंडलिक मधुकर तरडे (33) रा. महाड हा देखील रिक्षेतून प्रवास करीत होता. विक्रम रिक्षामध्ये बसल्यानंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीच्या शेजारी बसून अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याचे चाळे सुरू होते. त्यावेळी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी त्याला योग्य ती समज दिली तरी हा नराधम पिडीत मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये नराधम पुंडलिक तरडे यांच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तरडे याच्यावर भादवी 376 सह पॉक्सो कलम 4 व 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र माणगाव येथे सादर करण्यात आले. माणगाव विशेष न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर पीडित मुलगी व फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर खटल्याचे काम शासकीय वकील म्हणून अॅड. योगेश तेंडुलकर यांनी पाहिले. त्यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडल्यानंतर न्या. हर्षल भालेराव यांनी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख 55 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
यामध्ये न्यायालयाने भादवी 376 कलमान्वये 10 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड, पोक्सोे कायदा कलम 4 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंड त्यास बरोबर पोक्सो कायदा कलम 8 अन्वये 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.