बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

| महाड | प्रतिनिधी |

सदनिका देण्याच्या नावाखाली ग्राहकाची 21 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या महाड शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, योगेश रामचंद्र कळमकर असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात फसवणूक झालेल्या सुभाष गौरू पाटील यांनी तक्रार दाखल केली असून, 12 डिसेंबर 2017 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला आहे. सुभाष पाटील यांच्या तक्रारीनुसार, महाडमधील साई योग या इमारतीमध्ये योगेश कळमकर यांनी तालुक्यातील कोल येथे राहणार्‍या सुभाष पाटील यांना साडेसहाशे चौरस फुटांची सदनिका विकत दिली होती. तिची किंमत 23 लाख रुपये आहे. परंतु, या बिल्डरने ग्राहकाकडून 21 लाख रुपये घेऊन शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर साठेकरार करून दिलेला होता. असे असतानाही पाटील यांना विक्री करून दिलेली ही सदनिका कळमकर यांनी परस्पर मितेश चोपडा या अन्य ग्राहकाला विकली.

ही बाब लक्षात येताच पाटील यांनी या बिल्डरच्या मागे आपल्याला सदनिका मिळावी अथवा पैसे परत मिळावे यासाठी मागणी केली होती. परंतु, बिल्डरने त्यांना कोणतीही सदनिका दिली नाही. शिवाय, त्यांच्याकडून घेतलेले 21 लाख रुपयेही त्यांना परत दिले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतातच सुभाष पाटील यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार योगेश कळमकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करत आहेत.

Exit mobile version