। महाड । प्रतिनिधी ।
नव्याने बांधण्यात येणार्या इमारतीमधील सदनिका घेण्यास गेलेल्या एका ग्राहकाला बांधकाम व्यवसायिकाने लाखो रुपये घेवून देखील सदनिकेचा ताबा न दिल्याने सदर ग्राहकाने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार करताच बांधकाम व्यवसायिकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सदर बांधकाम व्यवसाइकास अटक करण्यात आली आहे.योगेश कलमकर असे बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे.
शहरातील कोटेश्वरी तळे परिसरातील सर्व्हे नंबर 1624, 1625, 1626 मधील मिळकत ही मूळ जागा मालकाकडून विकसित करण्यासाठी घेतली आहे. यामध्ये उभ्या राहणार्या योग सुशीला अपार्टमेंट या इमारतीमध्ये चंदा गोविंद कुडपाने वय 65 रा. सुंदरवाडी महाड या वयोवृद्ध महिलेस सदनिका खरेदी करायची होती. त्याकरिता पैसे दिले असता सन 2020 पर्यंत सदनिकेचा ताबा दिला जाईल असे सांगितले मात्र या व्यवहारापोटी बांधकाम व्यवसाईक योगेश कळमकर रा. महाड याने फिर्यादी यांचेकडून 54 लक्ष 25 हजार 100 रुपये घेतले. मात्र सदनिकेचा ताबा न दिल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी चंदा गोविंद कुडपाने यांनी बांधकाम व्यवसाईक योगेश कळमकर याच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. देण्यात आलेल्या तक्रारीनुसार योगेश रामचंद्र कळमकर याच्याविरोधात भाद्वी कलम 420, 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश कळमकर यांस अटक करण्यात आली असल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याचे तपासिक अमलदार विशाल शिंदे यांनी दिली.
००००००००००