| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देऊ शकतात, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केला आहे. सामना वृत्तपत्रातील रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे गटातील 40 पैकी 22 आमदार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सामनामधील रोखठोक कॉलममध्ये शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांची खूर्ची गणवेश काढला जाईल, असे आता सर्वांनाच समजल्याचे यामध्ये म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आणि सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असून, शिंदे गटाचे 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुतांश आमदार भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे. शिंदे यांच्या कृतीमुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले असून, राज्य त्यांना माफ करणार नाही आणि भाजप आपल्या फायद्यासाठी शिंदे यांचा वापर करत राहील, असे प्रकाशित करण्यात आलेल्या लेखात नमुद करण्यात आले आहे.
दिल्लीत प्रभाव नाही
वरील दाव्याशिवाय ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे विकासात योगदान दिसत नसून, देवेंद्र फडणवीस सर्वत्र दिसत आहेत. फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. याचाच अर्थ शिंदे यांचा दिल्लीत प्रभाव नाही हे स्पष्ट होते. असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.