संवेदनशील 16 मतदान केंद्रावर राहणार 83 सूक्ष्म निरीक्षकांची नजर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, कर्जत, मावळ, पिंपरी, चिंचवड या सहा विधानसभेतील दोन हजार 566 मतदान केंद्रांवर सोमवारी (दि.13) मतदान होणार आहे. 25 लाख 85 हजार 18 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संवेदनशील 16 मतदान केंद्रावर 83 सूक्ष्म निरीक्षकांची नजर असणार असून, या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
मावळ मतदारसंघातील अनेक भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचार सभा, रॅली, पथनाट्य, सभा घेण्यात आल्या. सभा, रॅलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापले होते. प्रशासकीय यंत्रणादेखील कामाला लागली होती. अखेर शनिवारी (दि.11) सायंकाळी पाचनंतर प्रचार थांबला. आता सोमवारी (दि.13) मतदान असणार आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याबरोबरच कामकाज योग्य पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचार्यांचे प्रशिक्षण घेण्यात आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघात प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
रायगडमधून 85 एसटी बसेस मावळ मतदारसंघातील मतदान सोमवारी आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांसह व्हीव्हीपॅट इतर साहित्यांची केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रायगड परिवहन महामंडळाकडे 85 एसटी बसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार रायगमधून 85 एसटी बसेस पाठविण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रावर राहणार नजर मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनदेखील कामाला लागले आहे. रविवारी सकाळपासून कर्मचारी केंद्रांवर रवाना झाले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये केंद्राध्यक्षांसह शिपायापर्यंत सहा कर्मचारी असे एकूण 11 हजार 368 अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. 13 लाख 49 हजार 184 पुरुष व 12 लाख 35 हजार 661 महिला तसेच तृतीयपंथी 173 मतदार मतदान करणार आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे मतदानाच्यावेळी मतदारांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी मंडप व्यवस्था केली आहे. केंद्रावर आरोग्य कर्मचारीदेखील नेमण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत प्रथमोपचार कीट देण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर दृष्टीक्षेप विधानसभा मतदारसंघ - केंद्र - कर्मचारी संख्या-मतदार संख्या उरण - 344 - 1,520 - 3,09,275 पनवेल - 544 - 2,404 - 5,65,912 कर्जत - 339 - 1,732 - 3,04,523 मावळ - 390 - 1,732- 3,67,534 पिंपरी - 400 - 1,776 - 3,64,806 चिंचवड - 549 - 2,436 - 5,95,408
भयमुक्त वातावरणात मतदान करा मावळ मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दिवशी काही गैरप्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे तसेच भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सत्य साई कार्तिक यांनी केले आहे.
मतदान केंद्रावर सोयी सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, प्रतीक्षा कक्ष, वेब कास्टींगद्वारे 50 टक्के मतदान केंद्र जोडण्यात आली आहेत. यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सात नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत.त्यासाठी दोन उपजिल्हाधिकार्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांनी दिली.