‘या‘ रुग्णांनी रुग्णवाहिकेतून केले होते मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने घेतली होती दखल

। रायगड । खास प्रतिनिधी ।

2019 साली झालेल्या रायगड लोकसभा निवडणुकीत एक महत्वाची घटना घडली होती. ती म्हणजे अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 25 रुग्णांना मतदान करण्याची व्यवस्था तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली होती. आजारी असतानाही मतदान करता आल्याने रूग्ण देखील चांगलेच खुश होते. या घटनेची नोंद भारतीय निवडणूक आयोगाने हायलाइटस ऑफ 2019 इलेक्शन या पुस्तकात घेतली होती. निवडणुकीत मतदानापासून कोणीच वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असतात. देशाचे राष्ट्रपती अथवा प्रधानमंत्री यांना मतदानाचा हक्क दिला आहे. तोच अधिकार सर्वसामान्य जनतेला देशाच्या संविधानाने दिला आहे.

2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2019 लोकसभा निवडणुकीचे रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर वार्तालाप करताना त्यांनी निवडणुकीतील अनेक किस्से सांगितले. त्यांच्या कार्यकाळातील मतदानाचा राबविलेला अनोखा प्रयोग त्यांनी विशद केला. 2019 साली रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरु होती. प्रमुख राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली होती. मतदानाची तारीख जशी जवळ येत होती, तशी केलेल्या तयारीचा आढावा सातत्याने घेण्यात प्रशासन व्यस्त होते. याच कालावधीत अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात काही कामानिमित्त गेलो होता;. तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करताना माझ्या डोक्यात विचार आला की, या रुग्णांना मतदान करता येणार नाही. ते मतदानापासून वंचित राहू नये यासाठी काही तरी केले पाहिजे, असा विचार माझ्या मनात रुंजी घालत होता, असे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

काही रुग्णांना विचारले की, तुम्हाला निवडणुकीत मतदान करायचे आहे का, असे विचारले असता, ते म्हणाले साहेब, मतदान तर करायचे आहे, मात्र रुग्णालयात भरती असल्याने तो मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. ज्या रुग्णांना चालता-फिरता येते, ज्यांना कमी त्रास होत असेल अशा रुग्णांना मतदानासाठी नेता येऊ शकते का, असे मी संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारले. त्यांनी देखील या संकल्पनेला दुजोरा दिला. त्यानंतर मतदानाच्या दिवशी 25 रुग्णांना रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर नेण्यात आले आणि त्यांनी सर्वोच्च असा मतदानाचा हक्क बजावला, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

या अनोख्या उपक्रमाची भारतीय निवडणूक आयोगानेदेखील दखल घेतली होती. 2019 साली प्रकाशित झालेल्या हायलाइटस ऑफ 2019 इलेक्शन या पुस्तकात या घटनेची नोंद घेतली होती. त्यांच्या पुस्तकात या अनोख्या उपक्रमाचा उल्लेख केला होता, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. हे माझ्या एकट्याचे श्रेय नव्हते, तर त्यामध्ये प्रशासनातील सर्व सहकाऱ्यांचादेखील तेवढाच वाटा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Exit mobile version