8 महिन्यात 252 बेपत्ता; 156 महिलांचा समावेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून 18 वर्षांखालील मुलींबरोबरच विवाहिता बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात 252 जण बेपत्ता झाले असल्याची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये 156 महिलांचा समावेश आहे. गुन्हे अहवालातील ही आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यभरात सध्या महिलांच्या बाबतीत इतके गंभीर गुन्हे घडत असताना, या आकडेवारीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मोबाईल, सोशल मीडियाचा वापर वाढल्याने मुली पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यात अल्पवयीन मुलीबरोबर विवाहिताही बेपत्ता होत आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात 96 पुरुषही बेपत्ता झाले आहेत.
महिला बेपत्ता झाली म्हणजे तीच स्वेच्छेने घरातून निघून गेली, असे दरवेळी कारण नसते. या बेपत्ता होण्याचे पर्यवसान शेवटी जिवावर बेतू शकते. बलात्काराच्या प्रकरणांमध्येही महिलेच्या ओळखीतीलच कुणी आरोपी असल्याचे प्रमाण मोठे असते. ही परिस्थिती गंभीर आहे.
घरगुती वादांमुळे कंटाळून घर सोडणे आणि प्रियकरासोबत पळून जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिला हरविण्याचे प्रमाण वाढले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे राग शांत झाल्यावर महिला घरी परतण्याचे प्रकारही घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून 18 वर्षांपुढील व्यक्ती गायब झाल्यास मिसिंगची तक्रार दाखल करण्यात येते. 18 वर्षांखालील वयोगटासाठी जाणीवपूर्वक अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. घरगुती भांडण आणि छळाला कंटाळून 40 टक्के महिला घर सोडून जात असल्याची माहिती समोर आली आहे.
नातेवाईकांकडून लैंगिक छळ, नोकरीचे आमिष, लग्नाचे आमिष या कारणांमुळेसुद्धा महिला घरातून निघून गेल्या आहेत. मात्र, कौटुंबिक वादातून हरवलेल्या महिला परत येण्याचे प्रमाण अधिक आहे, तर प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिला परत येण्याचे कमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गांभीर्याने होण्याची गरज
पोलिस ठाण्यात येणार्‍या ममिसिंगफकडे गांभीर्याने पाहण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यात मबायको मिसिंगफची तक्रार घेऊन येणार्‍या व्यक्तीवर प्रश्‍नांचा भडिमार करून त्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. मिसिंगची तक्रार घेऊन कळवतो, असे म्हणून तक्रारदारांची बोळवण केली जाते. मात्र, महिला मिसिंगमध्ये काही संशयाचा प्रकार आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जात नाही. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हेही समोर आले आहेत.

दाखल झालेल्या तक्रारी
जानेवारी – 23
फेब्रुवारी – 34
मार्च- 46
एप्रिल – 33
मे – 28
जून – 41
जुलै – 30
ऑगस्ट – 17

Exit mobile version