पेणमध्ये 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील डिसेंबर अखेर मुदत संपणार्‍या 26 ग्रामपंचायतच्या निवडणूका 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहेत. या 26 ग्रामपंचायतमध्ये आंबिवली, आमटेम, कणे, करोटी, कळवे, काराव, कोप्रोली, कोलेटी, खरोशी, जिते, डोलवी, दादर, दूरशेत, निगडे, पाटणोली, मळेघर, मसद बु., मुंढाणी, रोडे, वरप, वरसई, वाशीवली, सापोली, सावरसई, सोनखार, हमरापूर अदी ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी दिली.

निवडणूकीच्या तारखा जाहिर होताच आचार संहिता लागू झाली आहे. आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील प्रसार माध्यमांशी बोलताना तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी दिले आहेत. 26 ग्रामपंचायतीमध्ये प्रतिष्ठेच्या व श्रीमंत समजल्या जाणार्‍या काराव व डोलवी ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर लोकसंख्येचा विचार करता दादर व सोनखार ही मोठी ग्रामपंचायत आहे. तर बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा पाटणोली ग्रामपंचायतीमध्ये असते. त्यामुळे 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये राजकीय कलगी तुरा रंगलेला पहायला मिळणार.

या ग्रामपंचायतीच्या निकालावरच आगामी येणार्‍या पंचायत समिती व जिल्हा परिषदचा भवितव्य असल्याने राजकीय पुढारी देखील या ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये हिरहिरीने भाग घेताना आपल्याला पहायला मिळणार आहे.

Exit mobile version