कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आदिवासी महिलेकडून घेतले 2700 रुपये

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभाग हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर आदिवासी महिलांकडून प्रत्येकी 2700 रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.8) घडली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. काशिनाथ ठाकूर व पोंगडे महाराज यांनी आवाज उठविल्यानंतर ही बाब समोर आली.

लोकसंख्या नियंत्रणासाठी शासकीय आरोग्य केंद्रात सरकारकडून मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात; मात्र नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी 2700 रुपयांची मागणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, सुधागड-पाली तालुक्यातील वाकणगाव आदिवासी वाडीतील महिला कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी बाहेरुन येणाऱ्या डॉक्टरने त्या महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यांच्यावर तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यावेळी तेथील महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने रुग्णाकडून 2500 रुपये शस्त्रक्रियेचे व टाक्याचे 200 रुपये असे एकूण 2700 रुपये घेतले.

दिवसभर कष्ट करुन, वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून घर चालविणाऱ्या आदिवासी महिलेला इतकी रक्कम भरणे शक्य नव्हते. मात्र उधारी करुन त्या महिलेने रुग्णालयात पैसे भरले. याशिवाय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहनाने घर गाठले. मात्र इतका मोठा आर्थिक फटका बसल्यानंतर त्या महिलेने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा पश्चाताप व्यक्त केला. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची विदारक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी दुर्गम भागातील महिलांची आर्थिक लूट करीत असल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

राज्य सरकारचा आदिवासी विभाग आदिवासी महिला रुग्णांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र प्रत्यक्षात आदिवासी महिलांना कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे. याबाबत पिडित महिलेल्या नातेवाईंकासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजारो दिला.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आदिवासी महिलेकडून रक्कम घेतल्याबाबतची नोटीस आली. दुर्गम भागातील महिलांबाबत घडलेली ही बाब अतिशय गंभीर आहे. साहित्य उपलब्ध नसल्यास ते खरेदी करण्याचे अधिकार रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे टाक्याचे पैसे रुग्णांकडून घेणे चुकीचे आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठांसमवेत घटनास्थळी जाऊन माहिती घेतली जाईल. तसेच जिल्हा स्तरावर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पिडित रुग्णांकडून कोणत्या महिला कर्मचाऱ्याने पैसे घेतले, याबाबतही विचारपुस केली जाईल. तसेच पैशांची वसूली करुन रुग्णांना पैसे परत मिळविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल.

डॉ. आदित्य शिरसाठ, वैद्यकिय अधिकारी, नागोठणे
Exit mobile version