| पनवेल | वार्ताहर |
पनवेल देशाच्या सीमेचे रक्षण केलेल्या निवृत्त सैनिकाची मोठी फसवणूक झाली आहे. तब्बल साडेतीन कोटी रुपयांना फसवले. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात 31 जणांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत जवळपास 29 सैनिक फसल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरबीआयमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने ही फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्यामध्ये पनवेल, मुंबई, पुणे आणि कोकणातील निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. नोकरी लागण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे. मात्र, नोकरी तर सोडाच, आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे फसवणूक झालेले निवृत्त सैनिक संजय पवार यांनी सांगितले. दोन वर्षांपासून टप्प्या-टप्प्याने 31 जणांकडून ठरावीक पैसे आकारल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही रक्कम प्रत्येकी दोन लाखांपासून अठरा लाखांच्या घरात आहे. निवृत्त सैनिक असलेले बाळकृष्ण भोसले यांनी ही फसवणूक केल्याचा आरोप 31 जणांनी केला आहे. संबंधित व्यक्ती खारघर शहरात राहात असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवृत्त सैनिकांच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे. 25 लाखांपेक्षा जास्त आर्थिक फसवणुकीचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो. त्यानुसार आम्ही हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवल्यानंतर निश्चितच यासंदर्भात तथ्य पाहून गुन्हा दाखल होईल.
राजीव शेजवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर