30 हजार महिला साड्यांपासून वंचित

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी महिलांना साड्या देण्याचा मोठा गाजावाजा सरकारने केला. मात्र सहा महिने उलटूनही शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत या साड्या पोहचल्यात नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सुमारे तीस हजार महिला साड्यांपासून वंचित असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे. या साड्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये अजूनही पडून असल्याने त्यांची काय अवस्था झाली असेल असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

गुढी पाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा वेगवेगळ्या सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा देणार्‍या सरकारने महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागामार्फत गोरगरीब महिलांना साडी देण्याचा निर्णय सरकारने लोकसभा निवडणूकीपूर्वी घेतला होता. स्वस्त धान्य दुकानाद्वारे या साड्यांचे मोफत वाटप करण्यास सुरुवात झाली. त्याची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक लाभार्थी 83 हजार 306 आहेत. या लाभार्थ्यांपैकी 53 हजार 481 महिलांना साड्या देण्यात आल्या. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी साड्या वाटप थांबविण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून आचारसंहिता असल्याने महिलांना साड्या वाटण्यास अडथळे निर्माण झाले होते.आचारसंहिता संपून दोन महिने होत आली आहेत, मात्र अजूनपर्यंत शंभर टक्के महिलांपर्यंत साड्या वितरण करण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. जिल्ह्यातील 29 हजार 825 महिलांना साड्या देणे शिल्लक राहिले आहे. या महिला साड्यांपासून वंचित असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. शिल्लक साड्या वाटपाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु ऑनलाईन पध्दतीने साड्या वितरीत करताना महिलांना सर्व्हरचा फटका बसत आहे. साड्या घेण्यासाठी ताटकळत उभे राहण्याची वेळ महिलांवर आली आहे.

साड्या वाटपावर दृष्टीक्षेप
तालुके - वितरण केलेल्या लाभार्थ्यांची संख्या
कर्जत- सात हजार 967
मुरूड - एक हजार 536
माणगाव - सहा हजार 431
उरण - एक हजार 389
अलिबाग - चार हजार 516
सुधागड - चार हजार 677
पेण - पाच हजार 983
तळा - एक हजार 837
महाड - तीन हजार 34
पोलादपूर - एक हजार 186
रोहा - चार हजार 919
म्हसळा - एक हजार 177
श्रीवर्धन - एक हजार 291
खालापूर - चार हजार 352
पनवेल - तीन हजार 186
Exit mobile version