जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई
| जम्मू काश्मीर | वृत्तसंस्था |
जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत हरियाणाच्या हरीदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमधून 300 किलो आरडीएक्स, दोन एके 47 आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. डॉ. आदिल राठरने दिलेल्या इनपूटनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी डॉ. आदिल राठरला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. तसेच, त्याच्या साथीदार मुजमीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिसांना अनंतनाग येथील त्याच्या खोलीत एके 47 आढळून आली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, हरियाणाच्या मेडिकल कॉलेजच्या खोलीत दारुगोळा असल्याचे त्यांनी सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत हरियाण्याच्या फरिदाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात छापा टाकला. यावेळी डॉक्टर मुजमीलच्या खोलीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स, दारुगोळा आणि दोन एके 47 आढळून आल्या. पोलिसांनी ही स्फोटके ताब्यात घेतली आहेत. याद्वारे देशात मोठा घातपात करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपासही पोलिसांनी सुरु केला आहे.
याशिवाय दोघे डॉक्टर कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. तसेच, याप्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, त्याचे नेटवर्क कुठे आहे. याचा तपासही पोलीस करत आहेत. श्रीनगर आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. हे दोघे डॉक्टर जैश-ए-मोहम्मद किंवा गजवत-उल-हिंद या संघटनांशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.







