कारवाईच्या धसक्याने थर्टी फर्स्ट घरातूनच

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
2022 या नुतन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्हा पर्यटकांनी फुलून गेला. परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक नियम लागू करण्यात आले होते. पर्यटकांसह जिल्ह्यातील नागरिकांनी थर्टी फर्स्ट घरच्या घरीच साजरा केला. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, मैदाने ओस पडल्याचे दिसून आले.
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे येथील पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दर्शविली होती. 25 डिसेंबरपासून जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेजेस पर्यटकांनी फुलून गेले होते. अलिबागसह जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरून गेले होते. परंतू ओमीक्रोनच्या भितीने जिल्हा प्रशासनाने रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मज्जाव केला. जमावबंदी आदेश लागू केल्याने मैदान, समुद्रकिनारी व अन्य सार्वजनिक ठिकाणी थर्टी फर्स्ट साजरा करण्यावर निर्बंध लागले होते. शुक्रवारी 31 डिसेंबर रोजी थर्टी फर्स्ट घरच्या घरी साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले होते. शुक्रवारी सायंकाळनंतर समुद्रकिनारे, मैदान आदी ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देण्यात आले होते. हॉटेल व अन्य ठिकाणी विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईदेखील यंत्रणेकडून करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांनी हॉटेल, कॉटेजेस व स्थानिकांनी घरच्या घरी राहून थर्टी फर्स्ट साजरा केला.

Exit mobile version