दगडांची भिंत ढासळली; अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सहाण-पाल्हे मार्गावरील पुलाची दगडी भिंत ढासळली असून, लोखंडी सळ्या बाहेर निखळल्या आहेत. मागील वर्षभरापासून दुरुस्तीच्या नावाखाली मोठा खर्च झाला असला तरी पुलाची अवस्था गंभीर असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना पुलाच्या सुरक्षिततेबाबत अद्याप ठोस भूमिका समोर आलेली नसल्याने “धायतडकांचे मौन का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील सहाण बायपास मार्गे नागाव, रेवदंडा, मुरुड आदी ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या पाल्हे पुलाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. पुलाच्या बाजूची दगडी संरक्षक भिंत ढासळली असून, अनेक ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर दिसत आहेत. दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याठिकाणी 16 टनांवरील वाहनांना बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात 30 ते 40 टन वजनाचे डंपर आणि इतर अवजड वाहने दिवस-रात्र या मार्गावरून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलावरील ताण वाढत असून, संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
नागाव, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन परिसरासाठी हा पूल महत्त्वाचा दुवा मानला जातो. ऐन पावसाळ्यात पूल कोसळला तर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तसेच अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दगडी भिंतीचे दगड निखळले
पुलाच्या दगडी भिंतीचे दगड निखळले असून, अवजड वाहनांमुळे पूल कधीही कोसळू शकतो. आधीच वारंवार या पुलावर खडी, डांबराचा थर टाकून टाकून पुलाचे वजन वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे आधीच पुलाला स्वतःचाच भार पेलवत नसताना, त्यावरुन अवजड वाहतूक सर्रास सुरू आहे. त्यामुळे हादरे बसून, ऐन पावसाळ्या पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह दगडांवर आपटून दगडी भिंत कोसळून पूल कोसळण्याची भीती आहे. परंतु, जबाबदार अधिकाऱ्यांना याचे काहीच पडले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
वर्षभरापासून या पुलाचे काम सुरू आहे. परंतु, पुलाचे संरक्षक कठडे पूर्णतः कोसळले आहेत. अधिकाऱ्यांना कधीही फोन केला तरी काम सुरू आहे, एवढेच उत्तर मिळते. जबाबदार अधिकाऱ्यांनी वर्षभरात एकदा तरी स्थळपाहणी केली का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सुधागड तालुक्यातील आमणोली पूल क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याने 13 मे रोजी कोसळला. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. परंतु, हा पाल्हे पूल कोसळून दुर्दैवाने कोणती हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण, वर्षभर दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या पुलाची अद्याप डागडुजीच सुरू आहे. जर पूल पडला, तर ऐन पावसाळ्यात पर्यायी मार्ग कोठून देणार आहात? कारण, आधीच अलिबाग-रेवंदडा मुख्य रस्त्यावरील बेली येथील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभार आणि दूरदृष्टीच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पाल्हे बायपासवरील पूल नागाव, मुरुड, श्रीवर्धनकरांसाठी आर्थिक विकासाचा पूल आहे. याच पुलावरुन हजारो पर्यटक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही ये-जा करतात. अशा वेळी पूल कोसळून पडला तर सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यायी मार्ग कोठून देणार? पुलाखाली माणसे मेल्यावरच या विभागाला जाग येणार का? सत्ताधारी आणि राजकीय नेत्यांचा वचक या विभागाला राहिला नसल्याने ढिसाळ कारभार सुरू आहे.
ॲड. राकेश नारायण पाटील,
सामाजिक कार्यकर्ते









