जिल्हाधिकारी ते तहसीलदारांपर्यंत साऱ्या अधिकाऱ्यांच्या महसूल मंत्र्यांना पायघड्या
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
देशसेवेसाठी अवघ्या 21व्या वर्षी शहीद झालेल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि.1) त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शहीद तुणतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून दिलेली आगळीवेगळी मानवंदना यावेळी विशेष ठरली. मात्र, ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले, त्यांच्याच स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाकडे प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांच्यापैकी प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
शहीदाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी काही मिनिटे काढणेही प्रशासनाला शक्य झाले नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. शासकीय कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी वेळ काढणारे अधिकारी शहीदाच्या स्मृतीदिनासाठी मात्र वेळेअभावी गैरहजर राहतात का? अशी कुजबुज कार्यक्रमस्थळी ऐकायला मिळाली.
शहिद निलेश तुणतुणे ट्रस्ट व पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने 28 वा स्मृतिदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल राहूल माने, शहिद निलेश तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या अंजली ठाकूर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा अलिबाग पंचायत समितीचे सदस्य संतोष निगडे, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, नारायण तुणतूणे, निर्मला तुणतुणे, बेलोशीचे माजी सरपंच कृष्णा भोपी, ॲड.के.डी. पाटील, आदी मान्यवरांसह, माजी सैनिक, स्काऊडचे विद्यार्थी, सहाणगोठीमधील ग्रामस्थ,महिला, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल युध्दात शहीद झालेले सहाणगोठी येथील निलेश तुणतुणे यांचा स्मृतिदिन सहाणगोठी येथे भव्यदिव्य कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. माजी सैनिक, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक व पोलीस विभागाकडून तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र, पुप्षहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. सुरुवातीला रायगड पोलीस व स्काऊड गाईडच्या वतीने संचलन करण्यात आले. यावेळी खानाव येथील जिल्हा परिषद शाळेसह खानाव शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांमधून नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर लेझीम पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.
देशसेवेसाठी शहीद होणारे निलेश तुणतुणे यांच्या कार्यक्रमांचे आमंत्रण जिल्हाधिकारी जावळे यांच्यापासून पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांना दिले होते. मात्र यातील कोणीही अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकलेच नसल्याची चर्चा यावेळी दबक्या आवाजात सुरु होती. महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये महाराजस्व अभियान राबविण्यात आला. या कार्यक्रमात साधा उल्लेखही प्रशासनाकडून करण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेला या कार्यक्रमाचा विसर पडल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.







