। कल्याण । वार्ताहर ।
छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेल व एसएमएस वर वीजबिल मिळविण्याचा पर्याय देणार्या महावितरणच्या गो-ग्रीन योजनेस ग्राहकांची पसंती मिळत आहे. कल्याण परिमंडलातील 33 हजार 344 तर राज्यभरातील तीन लाखाहून अधिक ग्राहक गो-ग्रीन योजनेचा लाभ घेत आहेत. या ग्राहकांना प्रत्येक बिलात 10 रुपये अशी वर्षाला 120 रुपये सवलत मिळत आहे. कल्याण परिमंडलातील अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल n d www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. छापील वीजबिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागतो. हा कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचावी या पर्यावरण रक्षणाच्या हेतूने महावितरणने काही वर्षांपूर्वी मगो-ग्रीनफ योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छापील बिल नाकारून केवळ ई-बिल घेणार्या ग्राहकास दरमहा 3 रुपये सवलत दिली जात असे. ग्राहकांचा या योजनेकडे कल वाढावा यासाठी डिसेंबर 2018 पासून ही सवलत दरमहा 10 रुपये करण्यात आली. गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडणार्या ग्राहकांना छापील बिलाऐवजी केवळ ई-मेल व एसएमएस द्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जाते.