‌‘कमळ‌’ पतसंस्थेची 34 वी वार्षिक सभा

| अलिबाग | प्रतिनिधी |

‌‘कमळ‌’ या पतसंस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.29) कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके हे होते. यावेळी 97 व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात करण्यात आलेल्या नविन तरतुदीनुसार सभासद प्रशिक्षण आवश्यक करण्यात आले असल्याने संस्थेच्या सभासदांचे प्रशिक्षण घेण्यात आले. देशातील अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाचे प्रशिक्षण देण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्राधिकृत करण्यात आलेले वरुणा हवालदार, प्रवीणकुमार कुलकर्णी व सुधीर गायकवाड या अधिकारी वर्गामार्फत आर्थिक साक्षरता, डिजिटल बँकिंग व त्यामधील धोके या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. उपरोक्त प्रशिक्षणानंतर विषय पत्रिकेप्रमाणे सभेचे कामकाज सुरु करण्यात आले.

त्यानंतर नंदकुमार चाळके यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या गतवर्षीच्या वाटचालीचा व व्यवसाय वृद्धीचा धावता आलेख सभेपुढे सादर करून व्यवसाय वृद्धीकरीताच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानले. सभेमध्ये विषय पत्रिकेतील विषया संदर्भातील ठराव संस्थेच्या संचालकांनी सभेमध्ये विस्तृतपणे सादर केले. सर्व ठराव एकमताने मंजूर करित सर्व सभासदांनी संस्थेच्या कामकाजावर विश्वास व्यक्त केला. या विषयपत्रिकेतील विषय क्र. 13 व विषय क्र 14 हे संस्थेने नव्याने खरेदी केलेली जागा व त्यावर बांधावयाची इमारत यांचा संभाव्य आराखडा, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा. गिरीश तुळपुळे यांनी विस्तृतपणे सभेपुढे सादर केला. त्यामध्ये संभाव्य आराखडा, खर्च यांचा लेखाजोखा सभेपुढे सादर करीत सभासदांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी संस्थेच्या 1380 सभासदांनी सभेस उपस्थिती दाखवित प्रशासनावर विश्वास व्यक्त केला.

Exit mobile version