हर्षद आणि दुहिता गोळेसर यांच्या गायनाची रसिकांना पर्वणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये यावर्षीच्या दिवाळीच्या मंगलमय पहाटेला सुरांची स्वरमयी किनार लाभणार आहे. मैफिल, अलिबाग या संस्थेच्या वतीने रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात ‘सुरांची दिवाळी पहाट’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे सेमीफायनलिस्ट हर्षद आणि दुहिता गोळेसर हे प्रतिभावान गायक दाम्पत्य या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
वारकरी परंपरेचा वारसा लाभलेल्या सिन्नर येथील हर्षद गोळेसर यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीतसाधना सुरू केली. पुणे विद्यापीठाची बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स पदवी आणि गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. सध्या पं. प्रसाद खापर्डे यांच्याकडे रामपूर-सहस्वान घराण्याची तालीम सुरू आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवांत सुवर्णपदके मिळवणाऱ्या हर्षद यांना नुकताच पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारांतर्गत ‘यंग अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या ‘गणनायका’ या स्वरचित गीताला उत्कृष्ट संगीत संयोजनाचा MIMA पुरस्कारही मिळाला आहे.
दुहिता गोळेसर यांनी मुंबई विद्यापीठाची संगीत विषयातील पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली असून, सध्या विदुषी शाल्मली जोशी यांच्याकडे जयपूर घराण्याची तालीम घेत आहेत. युवा महोत्सवात सलग तीन वर्षे सुवर्णपदक मिळवणाऱ्या दुहितांनी ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटासाठीही पार्श्वगायन केले आहे.
1989 पासून मैफिल, अलिबागने पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, विदुषी प्रभा अत्रे, उस्ताद झाकीर हुसेन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमांतून अलिबागच्या रसिकांना अभिजात संगीताची समृद्ध पर्वणी दिली आहे. यंदा प्रथमच संस्थेतर्फे दिवाळी पहाटेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तबल्यावर निनाद कुणकवळेकर, पखवाजावर कृष्णा नवगिरे, हार्मोनियमवर संस्कार जानोरकर, साइड रिदमवर आकाश बैरागी आणि की-बोर्डवर शुभम यादव यांची साथ लाभणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी महेश गोडबोले (9763980563) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.






