पनवेलमध्ये आकाशात उंच झेपावणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध आणण्याची मागणी
। पनवेल । प्रतिनिधी ।
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर आणि परिसरात फटाक्यांच्या दुकानांची संख्या वाढत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विमानतळाच्या जवळील परिसरात आकाशात उंच झेपावणारे रॉकेट, मल्टिशॉट, मिसाईलसदृश फटाके आणि मोठ्या उंचीवर फुटणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर निर्बंध आणण्याची मागणी नागरिक, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. विमानतळाच्या आगमन व प्रस्थान मार्गाजवळ अशा प्रकारचे फटाके उडविल्यास विमानांच्या उड्डाण आणि उतरणीच्या वेळी संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो का, याचे तांत्रिक मूल्यांकन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. विमानांच्या सुरक्षित उड्डाणासाठी वैमानिकांना आवश्यक असलेली दृश्य स्पष्टता आणि दिशाभान अबाधित राहणे महत्त्वाचे असल्याने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.
यापूर्वी गणेशोत्सव काळातही पनवेल पोलिसांनी नवी मुंबई विमानतळाच्या हवाई सुरक्षेचा विचार करून लेझर लाईट आणि लेझर शो टाळण्याचा सल्ला आयोजकांना दिला होता. विमानांच्या उड्डाण व उतरणीच्या वेळी तीव्र लेझर प्रकाशामुळे वैमानिकांच्या दृश्य दिशाभानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले होते. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकाशात उंच जाणाऱ्या फटाक्यांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. विशेषतः विमानतळाच्या हवाई मार्गालगत असलेल्या परिसरात रॉकेट, मल्टिशॉट आणि मोठ्या उंचीवर फुटणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापराबाबत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सध्या पनवेल शहरातील सर्व फटाक्यांच्या दुकानांवर किंवा सर्व प्रकारच्या फटाक्यांवर सरसकट बंदी असल्याचा अधिकृत आदेश उपलब्ध नसला, तरी विमानतळाच्या हवाई सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र निश्चित करून आवश्यक निर्बंध लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पनवेलमधील फटाक्यांच्या दुकानांना परवाने देताना विमानतळाच्या हवाई मार्गांचा विचार केला जातो का, उंच आकाशात जाणाऱ्या फटाक्यांमुळे विमानांच्या उड्डाण आणि उतरणीच्या प्रक्रियेत संभाव्य अडथळा निर्माण होऊ शकतो का, तसेच फटाक्यांची साठवणूक आणि विक्रीस्थळांची नियमांनुसार तपासणी होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्हाधिकारी रायगड, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी संयुक्त बैठक घेऊन या विषयाचे तांत्रिक मूल्यांकन करावे. विमानतळाच्या आगमन व प्रस्थान मार्गांचा अभ्यास करून संभाव्य धोक्याची ठिकाणे निश्चित करावीत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिबंधात्मक नियमावली तयार करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवाळीचा आनंद साजरा करताना विमान प्रवासी, वैमानिक आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यामुळे फटाक्यांच्या दुकानांना परवाने देताना केवळ नियमांची औपचारिक पूर्तता न करता विमानतळाच्या हवाई सुरक्षेचाही स्वतंत्रपणे विचार करावा. संभाव्य धोकादायक फटाक्यांच्या विक्री व वापरावर आवश्यक निर्बंध आणून प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पनवेलकरांकडून होत आहे.






