नव वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेच्या 36 स्पेशल गाड्या

| रोहा | प्रतिनिधी |

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण, गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 36 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणसह गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते थिविमदरम्यान 24 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01151 सीएसएमटी-थिविम ही गाडी 22 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान रोज रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटून दुपारी 2 वाजता थिविमला पोहोचणार आहे. परतीकरिता गाडी क्रमांक 01152 दररोज दुपारी 3 वाजता थिविम स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेरणेम स्थानकात थांबा दिला आहे.

तसेच, पनवेल ते करमाळी दरम्यान 4 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01147 पनवेल-करमाळी ही गाडी 23 आणि 30 डिसेंबरला रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमाळीला पोहोचणार आहे; तर गाडी क्रमांक 01148 करमाळी-पनेवल 23 आणि 30 डिसेंबरला सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी करमाळी स्थानकावरून सुटून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. या गाडीला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय पुणे ते अजनी दोन फेऱ्या चालवण्यात येणार असून गाडी क्रमांक 01465 ही 26 डिसेंबर आणि 2 जानेवारीला सुरू असेल. दुपारी 3.15 वाजता ही गाडी पुणे स्थानकावरून सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4.50 वाजता पोहोचेल; तर गाडी क्रमांक 01466 ही 27 डिसेंबर आणि 3 जानेवारीला 2024 रोजी संध्याकाळी 7.50 वाजता अजनी स्थानकावरून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड दोरमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा दिला आहे.

आरक्षण लवकरच
सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण मंगळवार, 21 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहे.

Exit mobile version