पाच खासगी बंदरे, प्रकल्पांकडे 38 कोटींची मालमत्ता थकबाकी

हनुमान कोळीवाडा ग्रा.पं.च्या जप्तीच्या नोटीस
। उरण । वार्ताहर ।

उरण येथील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत जेएनपीटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच खासगी बंदर व प्रकल्पाने मालमत्ता कराची 37 कोटी 78 लाख 33 हजार 20 रुपये थकवले आहेत.वारंवार मागणी करुनही मालमत्ता कराची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या या पाचही बंदर व प्रकल्पांवर थकबाकीच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत.30 दिवसांच्या दिलेल्या मुदतीत थकित रकमेचा भरणा न केल्यास कारवाईचा बडगा उगारुन मालमत्ताच जप्त करण्याचा इशाराही ग्रामपंचायतीने संबंधित थकबाकीधारक बंदरे, प्रकल्प अधिकार्‍यांना दिला आहे.

शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हजारो हेक्टर जमिनी जेएनपीए बंदर उभारण्यासाठी संपादन करण्यात आल्या आहेत.बंदराच्या उभारणीसाठी शेवा व हनुमान कोळीवाडा गावांचे उरण परिसरातील अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील संपादन करण्यात आलेल्या जागेवर जेएनपीएने बंदर व प्रकल्पांची उभारणी केली आहे.जेएनपीए अंतर्गत खासगीकरणातुन उभारण्यात आलेल्या एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, जीटीआय, बीपीसीएल, बीएमसीटीपीएल या पाचही खासगी बंदरे आणि प्रकल्पांकडे ग्रामपंचायतीची मालमत्ता कराची एकूण 37 कोटी 78 लाख 33 हजार 20 रुपयांची रक्कम थकीत आहे.

या मालमत्तेच्या कोट्यावधींच्या थकित रकमेचा भरणा करण्यासाठी मागील आठ-दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीने नियमानुसार अनेकदा पत्र,बिले पाठवुन मिनतवार्‍या केल्या आहेत.प्रसंगी वसुलीसाठी नोटीसाही बजावल्या आहेत.मात्र ग्रामपंचायतीच्या विनंती,नोटीसांना पाचही खासगी बंदर आणि प्रकल्पांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीने संबंधित पाचही खासगी बंदरे या प्रकल्पांना जप्तीची कारवाई करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.नोटीस दिल्यापासून 30 दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कराची रक्कम जमा न केल्यास मालमत्ताच जप्त करण्याचा निर्वाणीचा इशाराही हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीने दिला आहे.

थकबाकीदार कंपन्या
एनएसआयसीटी : 8 कोटी 59 लाख एक हजार 241
एनएसआयजीटी: 2 कोटी 74 लाख 94 हजार 812
जीटीआय : 15 कोटी 49 लाख 31 हजार 437
बीपीसीएल : 1 कोटी 75 लाख दोन हजार 485
बीएमसीटीपीएल: 9 कोटी 20 लाख तीन हजार 45

मागील आठ-दहा वर्षांपासून संबंधित खासगी बंदरे व प्रकल्पांकडे मागणी करुनही मालमत्ता कराची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत.सुमारे 38 कोट्यावधींच्या मालमत्ता कराच्या थकित रक्कमेमुळे मात्र ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसली आहे.

परमानंद कोळी, सरपंच,हनुमान कोळीवाडा
Exit mobile version