| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यावर आला आहे. 210 पैकी 38 सरपंच तर 1,854 पैकी 565 सदस्य हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे 168 सरपंच तर 1,291 सदस्य पदाच्या जागेसाठी रविवारी मतदान होणार आहेत. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने बिनविरोध सरपंच, सदस्य विजयी झाले आहेत.
अलिबाग 15, मुरुड 15, पेण 11, पनवेल 17, उरण 3, कर्जत 7, खालापूर 22, रोहा 12, सुधागड 13, माणगाव 26, तळा 6, महाड 21, पोलादपूर 22, श्रीवर्धन 8, म्हसळा 12 अशा 210 ग्रामपंचायतमध्ये 210 सरपंच, 1,854 सदस्य पदासाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 1,854 सदस्य पदासाठी 3,395 उमेदवार तर 210 सरपंच पदासाठी 485 उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. स्थानिक पातळीवर सामंजस्याने ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने 38 सरपंच आणि 565 सदस्य बिनविरोध करण्यात यश आले आहे.
विविध ग्रामपंचायतीमध्ये 38 सरपंच बिनविरोध झाले असेल तरी त्याठिकाणी सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. रविवारी 5 नोव्हेंबर रोजी मतदार हा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, तर सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.