बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्हा बँकेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वच उमेदवार मतदारांशी चर्चा, गाठी भेटीत रंगले आहेत. तर यातील 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीची सत्ता कायम राहते की भाजप बँकेवरील सत्ता खेचून घेते हे 31 डिसेंबर रोजी निकालानंतर स्पष्ट होणार असून येणारे नविन वर्ष कोण उत्साहात साजरे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 19 संचालकपदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधून 22 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कुडाळ वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. कुडाळ शेती उत्पादन मतदारसंघातून प्रकाश मोर्ये (भाजप), सुभाष मडव (भाजप) तर महाविकास आघाडीचे विद्या प्रसाद दयानंद बांदेकर अशी तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे शेती उत्पादनाच्या मतदारसंघात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.
जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि महा विकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई अशी लक्षवेधी दुरंगी लढत आहे. या मतदारसंघात तिसरे उमेदवार सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुरंगी लढत होत आहे. नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे.
महिला प्रतिनिधी मतदारसंघातून होणार्‍या या लक्षवेधी निवडणुकीत कणकवली येथील प्रज्ञा ढवण, अस्मिता बांदेकर (भाजप) विरुद्ध कुडाळ येथील नीता राणे व सावंतवाडीच्या अनारोजी लोबो (महाविकास आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर यांच्यात लढत होणार आहे.
इतर मागास मतदारसंघातून होणार्‍या दुरंगी लढतीत भाजपचे रवींद्र मडगावकर विरुद्ध महाविकास आघाडीचे मनिष पारकर यांच्यात लढत होणार आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपचे गुलाबराव चव्हाण आणि महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी यांच्यात लढत होत आहे.

Exit mobile version