| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत मध्ये 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या सात ग्रामपंचायतींमधील 69 जागांपैकी 14 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने आता 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी थेटसरपंच पदासाठी 20 उमेदवार यांच्यात ही लढत होणार असून, त्यातील एक ग्रामपंचायत वगळता अन्य सहा ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे.
तालुक्यातील कोंदिवडे, मांडवणे, उकरूळ, वेणगाव, वावळोली, दहिवली तर्फे वरेडी या सात ग्रामपंचायतींमध्ये 18 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदांसाठी मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे.थेट सरपंच निवडणूक हि राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर होत नसल्याने स्थानिक आघाडी यांचे राजकारण या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे.सात ग्रामपंचायत मध्ये 69 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती,मात्र त्यातील तीन ग्रामपंचायत मधील 14 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे 55 जागांसाठी हि निवडणूक होणार आहे. मात्र खरी चुरस थेट सरपंच पदांच्या निवडणुकीत दिसत असून सात ग्रामपंचायत मधील थेट सरपंच पदाच्या सात जागांसाठी तब्बल 20 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील साह ग्रामपंचायत मध्ये तिरंगी लढत होत असून एका ग्रामपंचायत मध्ये दुरंगी लढत होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये तेथील सर्वसाधारण थेट सरपंच पदासाठी प्रमोद विश्वनाथ देशमुख,तानाजी बाबू पाटील आणि शालन बबन शेलार यांच्या तिरंगी लढत होत आहे. मांडवणे ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पॅड सर्वसाधारण महिला यांच्यासाठी राखीव असून तेथे पुष्पा पंढरीनाथ आगज,नीता नामदेव गायकवाड आणि रंजना बाळकृष्ण सावंत यांच्या तिरंगी लढत होत आहे.उकरूळ ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच सर्वसाधारण महिला साठी राखीव असून तेर्थे विद्यमान सरपंच वंदना संतोष थोरवे तसेच निर्मला योगेश थोरवे आणि कोमल गणेश खडे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.वेणगाव ग्रुप ग्रामपंचायत मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी सरपंच पद राखीव असून तेथे सारिका सुनील आंग्रे,अश्विनी मंगेश पालकर आणि सीमा सुभाष पालकर यांच्या तिरंगी लढत होत आहे. वावळोली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण असलेल्या सरपंच पदासाठी माजी सरपंच बाळू पुंडलिक थोरवे यांच्या समोर एकनाथ गणपत भगत यांनी आव्हान उभे केले आहे.तर कळंब या मोठ्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव असून तेथे माजी सरपंच प्रमोद कोंडिलकर तसेच अरुण नामदेव बदे आणि रामचनद्र पांडुरंग बदे यांच्यात तिरंगा लढत होत आहे. दहिवली तर्फे वरेडीमध्ये सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून त्या ठिकाणी वर्षा विष्णू कालेकर, नेत्रा निलेश तरे आणि मेघा अमर मिसाळ यांच्या तिरंगी लढत होत आहे.