10 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आठ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर, उर्वरित 18 संचालक यांच्यापैकी 10 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या आठ संचालक यात शेतकरी कामगार पक्षाचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रत्येकी एक-एक संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे आठ पैकी सात संचालक निवडले गेले आहेत.
18 संचालकपदांच्या निवडणुकीसाठी 55 उमेदवार यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अनेक गटातील उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यात ग्रामपंचायत सदस्य यांच्या गटात असलेल्या चारही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. या गटातून केतन विष्णु झांजे-शिवसेना, हर्षद अशोक भोपतराव- राष्ट्रवादी काँग्रेस, रेणुका जगदीश मिरकुटे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आदित्य रामभाऊ गायकवाड- शेतकरी कामगार पक्ष यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीमधील हमाल तोलारी गटामधील एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिंद्र रामभाऊ कुलाल तसेच भटक्या विमुक्त जातीमधील एका संचालक पदावर शेतकरी कामगार पक्षाचे रमाकांत नथु जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. महिला सर्वसाधारण जागेवरील दोन संचालक पदांवर शेतकरी कामगार पक्षाच्या सुप्रिया विलास थोरवे आणि अर्चना दिलीप शेळके यांचीदेखील बिनविरोध निवड झाली आहे.
उरण तालुक्याचे निबंधक राजेंद्र गायकवाड हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून, त्यांना सहकार्य कर्जत निबंधक कार्यालयाचे अव्वल कारकून सुनील दांगट, शिपाई गजानन लाडके यांचे सहकार्य लाभले. निवडणूक होत असलेल्या संचालक पदांच्या जागांमध्ये कृषी पतसंस्था बहुउद्देशीय संस्थामध्ये सर्वसाधारण सात जागांसाठी 11 उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. इतर मागासवर्गामध्ये एका जागेसाठी दोन आणि व्यापारी अडते गटातील दोन संचालक जागांसाठी चार उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत.