ज्येष्ठांसाठी अर्थसंकल्पात 4 टक्के तरतुद करावी

| आगरदांडा | वार्ताहर |

पाश्‍चात्य देशात ज्येष्ठांना अनुभवाची शिदोरी असलेली राष्ट्रीय संपत्ती म्हणून संबोधले जाते आणि तशा सवलती शासनकर्ते देऊ करतात. आपल्या देशात तसेच राज्यात ज्येष्ठ नागरिकांना काही दिले जात नाही ही खंत आहे. म्हणून शासनाने ज्येष्ठांना दरमहा 10हजार निर्वाह भत्ता द्यावा. राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सुरेश पालकर यांनी केली.

मुरुड येथील तालुका सेवा निवृत्त संघटनेच्या पदाधिकार्‍यां समवेत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मुरुड तालुका सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष नयन कार्णिक, उपाध्यक्ष केशव साने, सचिव मनोहर दिघे, समन्वयक एम एस जाधव, बी . व्ही कासार, गजानन पाठक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, प्रकाश पाटील, उषा वैद्य, यशवंत पाटील, रमेश कवळे, विलास जगताप आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत 60 वर्षे वय ग्राहय धरून ज्येष्ठतेचा लाभ मिळावा, स्मार्ट कार्ड परिवहन खात्याने सक्तीचे न करता पूर्वी प्रमाणे आधार कार्ड, निवडणूक कार्ड हे गृहीत धरून 50 टक्के प्रवास सवलत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या. मुरुड तालुक्यात ज्येष्ठ नागरिक संघटना पूर्ववत कार्यरत करून तालुक्यातील असंघटीत ज्येष्ठांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे असे नयन कर्णिक यांनी सांगितले. शेवटी मनोहर दिघे यांनी आभार प्रर्दशन केले.

Exit mobile version