| आगरदांडा | प्रतिनिधी |
पुरोगामी महाराष्ट्र राज्य शासनाने सेवा निवृत्तांचीसंख्या लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवा निवृत्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय विभाग स्थापन करावे. प्रशासनाने संवेदनशील होऊन निवृत्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आवाहन रायगड जिल्हा सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष धुरंधर मढवी यांनी केले. मुरुड येथे मुरुड तालुका सेवा निवृत्त संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना धुरंधर मढवी बोलत होते.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, केंद्रीय निवृत्तांप्रमाणे दरमहा 1 हजार रुपये वैद्यकीय भत्ता मिळाला पाहिजे, तसेच ज्येष्ठांना सेवा निवृत्तांप्रमणे वयोपरत्वे केंद्रीय वाढीचे दराने लाभ मंजूर करावेत आणि निवृत्त धारकांवर अवलंबून कुटुंबातील अविवाहित मुली, घटस्फोटित मुली तसेच दिव्यांग मुलींना कुटुंब निवृत्ती वेतनाच्या आदेशानुसार त्यांना निवृत्ती वेतन सुरु करावे, अशी मागणी केली.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष धुरंधर मढवी, रविंद्र पाटील, सुरेंद्र जाधव, तालुका संघटनेचे अध्यक्ष नयन कर्णिक, उपाध्यक्ष शकील कडू, कोषाध्यक्ष गजानन पाठक, सचिव उल्हास भगत, डॉ मकबुल कोकाटे, प्रा. एम.एस. जाधव, बाळकृष्ण कासार, रवींद्र जंजिरकर, विलास जगताप, उषा खोत, नैनिता कर्णिक, सुगंधा दळवी, रमेश कवळे, भाई मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.