ग्रामीण भागातील पाच शाळांना संधी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुका शिक्षण विभागाच्यावतीने कला महोत्सव आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील 274 शाळांनी सहभाग घेतलेल्या व्यक्तिमत्व विकास महोत्सवात प्रथम क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांना एन.डी. स्टुडिओत सादरीकरण करण्याची संधी मिळाली. दरम्यान, व्यक्तिमत्व विकास महोत्सवाच्या अंतिम फेरीचे परीक्षण प्रसंगी नाट्य निर्माते प्रदीप गोगटे यांनी विजेत्या शाळेला एन.डी. स्टुडिओत सादरीकरण करण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.
कर्जत तालुक्यात नुकत्याच केंद्र निहाय व्यक्तित्व विकास स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी, 25 केंद्रामधील प्रथम क्रमांक आलेल्या शाळांची पाच बिटमध्ये स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर तालुका स्तरीय स्पर्धेचे नियोजन कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर येथे करण्यात आले होते. त्या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे परीक्षक नाट्य निर्माते प्रदीप गोगटे यांनी विजेत्या स्पर्धकांना एन.डी. स्टुडिओत सादरीकरण करण्याची संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या मार्फत रा.जि.प. शाळा आसलपाडा, रा.जि.प. शाळा हलिवली, तसेच हातनोली कातकरीवाडी, कर्जत महिला मंडळ शारदा मंदिर, कालभैरव किरवली यांना एन.डी. स्टुडिओमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली. या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कलाकारांसोबत आपल्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी, कर्जत तालुक्यातील पाच शाळांच्या 113 विद्यार्थ्यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांच्या सोबत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ संचालिका म्हसे, संचालक संजय पाटील, महेश भांगरे, तसेच एन.डी स्टुडिओचे हेमंत भाटकर, भाई देसाई, नाट्य निर्माते प्रदीप गोगटे, कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, सुरज ठाकूर, मीना प्रभावळकर, मुख्याध्यापिका स्नेहा गाढे, गोविंद ठाकूर, बोराडे आदी उपस्थित होते.
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी ग्रामीण भागातील तरुणांना व विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यास सुरुवात केली होती. आता महाराष्ट्र शासनाने हि परंपरा पुन्हा एकदा सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने नितिन देसाई संकल्पना पुन्हा एकदा सुरू केली ही अभिमानाची बाब आहे.
प्रदीप गोगटे,
नाट्य निर्माते