कोंडी सोडविण्यासाठी महामार्गात बदल
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत श्री बल्लाळेश्वर विनायकाचा माघीगणेशोत्सवाला गुरुवार दि.30 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. चार दिवस सुरू राहणार्या या उत्सवाची सांगता रविवारी दि.2 फेब्रवारी रोजी होणार आहे. दरम्यान, येथे दिवसभर धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.1 फेब्रवारी रोजी श्री गणेश जयंतीला लाखो भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दाखल होतील, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, माघी गणेशोत्सवानिमित्त पालीत मोठी यात्रा भरली असून यात्रेत कोट्यावधींची उलाढाल होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने देवस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र गद्रे यानी दिली आहे. गुरुवारी (दि.30) पहाटे काकड आरती व अभिषेक, गायनाचा कार्यक्रम आणि कीर्तन हे कार्यक्रम संपन्न झाले. शुक्रवारी (दि.31) सकाळी अभिषेक, दुपारी भजन, हळदीकुंकू, मंत्रजागर, कीर्तन, सनईवादन, अभिषेक आणि श्रींचे जन्मोत्सव कीर्तन होणार आहेत. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा असणार आहे. रविवारी दि.2 फेब्रुवारी रोजी महाप्रसाद, नाटक, उत्तररात्री असे कार्यक्रम होणार आहेत.
योग्य नियोजन
माघी महोत्सवानिमित्त प्रशासन, नगरपंचायत, पोलीस व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत तर्फे बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अधिकची पोलीस कुमक व अधिकारी दाखल झाले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षारक्षक तैनात
पालीत दाखल होणारी वाहने स्टेट बँक ऑफ इंडिया येथून येऊन राजीप व टॉपवर्थ शाळेच्या बाजूने भक्त निवास क्रमांक एक जवळून वळविण्यात आली आहेत. तर, मंदिराजवळून येणारी वाहने याच मार्गावरून येऊन पुढे महाकाली हॉटेल जवळून हाटाळेश्वर चौकातून मिनिडोअर स्टॅण्ड जवळ पाली खोपोली मार्गावर वळवली आहेत. या मार्गावर काही ठिकाणी धुरळा उडू नये म्हणून नगरपंचायत मार्फत नियमित पाणी मारले जात आहे. तसेच, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत.
पालीत विक्रेते दाखल
बल्लाळेश्वर मंदिरापासून सोनार आळी व पार्किंगपर्यंत यात्रा भरली आहे. याठिकाणी खेळणी, घरगुती वस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू आदी विविध वस्तूंची दुकाने मांडण्यात आली आहेत. तसेच, फिरते विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले व मिठाईवाले देखील दाखल झाले आहेत. आकाश पाळणे व इतर पाळणे लागले आहेत. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.