। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोमनाथ घार्गे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गेली पाच वर्ष या संघटनेचे लढवय्या अध्यक्ष राजेंद्र कासार यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्या अनेक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला व अनेक प्रश्न मार्गी लावले. सर्वाना एकत्र आणण्यासाठी संघटनेसाठी कार्यालय तयार केले. या संघटनेने महाड येथील महापुरात पूरग्रस्तांना जेवण, कपडे वाटप केले असून दोन वेळा रक्तदान शिबीर आयोजित करून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हातभार लावला आहे. कोविड काळात सुध्दा या संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डि.वाय.एस.पी. मारुती पाटील, रायगड सेवा निवृत्त पोलीस कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासार, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, कोषाध्यक्ष सुनील गोंधळी, विलास जाधव, मांगुळकर, बळीराम वारे, शंकर पाटील, गव्हाणे आदिंसह पोलीस अधिकारी, शिपाई व निवृत्त पोलिस कर्मचारी उपस्थित होते.