| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांचा गुरुवारी (दि. 4) वाढदिवस आहे. यानिमित्त वरसोलीमध्ये रक्तदान व मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने लायन्स क्लब अलिबाग व रक्तबंध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील वरसोली कोळीवाडा येथील खंडोबा मंदिरामधील सभागृहात शिबीर घेतले जाणार आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, अलिबाग नगरपरिषदेचे जल व निचरा विभागाचे सभापती अनिल चोपडा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिराच्या सुरुवातीला शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यानंतर रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अश्रु ग्रंथी, तिरळेपणा या नेत्रविकारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती वरसोली येथील सुरेशकाका घरत मित्रमंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.







