विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखाली भाजपचे माजी सरपंच महेश लक्ष्मण पाटील (42) यांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत संशयित महेश पाटील यांनी विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, प्रत्यक्षात लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा वेगुर्लेकर करीत आहेत. दरम्यान, राजकीय क्षेत्रातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.






